सरकार पाडण्याचे भाजपचे सगळे मुहूर्त हुकले : खडसे

मुंबई – राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या आधी अनेक वेळा मुहूर्त सांगितले होते तारखाही दिल्या होत्या. पण ते सारे मुहूर्त फसले आहेत आता त्यांना केवळ सरकार पडण्याची वाटच पहात बसावे लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आज भारतीय जनता पक्षातच प्रचंड अस्वस्थता असून त्यातून आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना सरकार पडणार अशा वावड्या सारख्या उठवत राहाव्या लागतात.
भारतीय जनता पक्षातील अनेक आमदारांना मीच पक्षात प्रवेश दिला आहे आणि त्यातील अनेकांना मीच तिकिटे मिळवून दिली आहेत. त्यामुळे हे लोक माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. त्यातून भारतीय जनता पक्षातच किती अस्वस्थता आहे याची आपल्याला कल्पना येते असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या. फडणवीसांनीही एक तारीख दिली होती; पण त्या तारखा हुकल्या आहेत. पण काहीही होत नाही उलट हे सरकार दिवसेंदिवस मजूबतच होताना दिसत आहे, असे ते म्हणाले.





