ठरलं तर…! अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार ; नेमकी काय आश्वासनं मिळणार ?

BJP Manifesto । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून र्तोज नवीन राजकीय हालचाली होताना दिसून येत आहे. त्यातच राज्यात एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यातच भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार सभा मोठ्या प्रमाणात होत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि धुळ्यात सभा पार पडली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सातारा, कोल्हापूर, सांगलीत सभा पार पडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी , काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
भाजपचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार? BJP Manifesto ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करू शकतात. भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीची पंचसूत्री BJP Manifesto ।
दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना महिना ३ हजार रुपये देणार, तसेच महिलांना एसटीचा प्रवासही मोफत असणार, बेरोजगार तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये मिळणार, शेतकऱ्यांची ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा, आणि औषधे मोफत मिळणार, जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देणार, अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.





