‘ठाकरे बंधूं’च्या विजयी मेळाव्या अगोदर भाजप नेत्याच मोठं विधान

Sudhir Mungantiwar : तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित राहणार आहेत. वरळीतील डोम सभागृहात विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मोठी जय्यत तयारी मेळाव्यासाठी करण्यात आली आहे. दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी इच्छा आता शिवसैनिक आणि मनसेची पूर्ण होणार आहे. मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपच्या एका बड्या नेत्यांने एक मोठं विधान केले आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूनी दोन्ही पक्ष एकत्रित करावेत, असे विधान केले आहे. त्यामुळे आता मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांना आमच्या कायमच शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे. एकत्र रहावे आवश्यकता असेल तर दोन्ही पक्षाचे एक पक्ष करावेत, असे सुधीर मुनगंटीवर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंना दोन्ही पक्ष (शिवसेना-मनसे) एकत्र करण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही बंधू सोबत आले तर आपण त्यांच्यासोबत जायचं नाही अशी काँग्रेसची भूमिका, असल्याचे मी ऐकलं, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
ठाकरे बंधू काय बोलणार?
या मेळाव्याचा हेतू ठाकरे बंधूंनी आधीच स्पष्ट केला असून माय मराठी भाषेच्या मुद्यावर हे दोघेही एकत्र आले आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्ती करणारा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही कडाडून विरोध दर्शविला. तसेच राज्यभरातून या निर्णया विरोधात सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली.
सुरुवातीला हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सरकारने हा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्रित येत विजयी मेळावा करणार असल्याची घोषणा केली. आता या मेळाव्यातून ठाकरे बंधूंची तोफ कुणाकुणावर डागली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : ना झेंडा, ना चिन्ह राज ठाकरेंच्या आवाहनाला संदीप देशपांडेंची साद; मराठीत लिहिलेल्या टी-शर्टने वेधले लक्ष





