‘औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करा, यामुळे…’; भाजपच्या नेत्याने सरकारकडे केली मागणी

Aurangzeb Tomb Row | सध्या महाराष्ट्रातील राजकारण मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यातच आता ‘कबर हटवली जात नसेल, तर तेथे थुंकण्याची व्यवस्था करावी’, अशी मागणीच भाजप नेते सुनील देवधर यांनी केली आहे.
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सुनील देवधर यांनी औरंगजेबाची कबर हटवली जात नसेल, तर तेथे थुंकण्याची व्यवस्था करावी. यामुळे तेथील पर्यटनही वाढेल, असे वक्तव्य केले आहे. ही कबर हटवण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता देवधर यांनी हे वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुनील देवधर म्हणाले की, हाराष्ट्रात देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे, जे काही होईल ते कायद्यानेच होईल. औरंगजेबाच्या कबरीला उखडून टाकावे अशीच माझी भूमिका आहे. कबरीला हटविण्यात येत नसेल तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करावी. यामुळे तेथील पर्यटन तरी वाढेल, अशी मागणी त्यांनी केली. देवधर हे भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव देखील होते.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. इथे महिमा मंडन होईल तर शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच, औरंगजेबाच्या कबरीला ASI ने पन्नास वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.





