पुण्यात राजकीय गणितं बदलणार ? शरद पवार देणार भाजपला दुसरा धक्का

पुणे : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पक्षातील काही नेते तिकीट मिळण्याच्या आशेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर आता शरद पवार भाजपला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे काकडेंच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.
समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, त्यानंतर आता संजय काकडे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी औपचारिक बैठक करून दसऱ्यानंतर पक्षप्रवेश करणार असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत संजय काकडे?
संजय काकडे हे सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. अपक्ष खासदार म्हणून काकडेंनी भाजपला केंद्रात पाठींबा दिला होता. संजय काकडे यांचे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत संजय काकडे यांची भूमिका निर्णायक असते. संजय काकडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. पुणे जिल्ह्यातील मराठा चेहरा म्हणून संजय काकडे यांची ओळख आहे.





