Ram Shinde: राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड, विरोधकांचे आभार मानत फडणवीस म्हणाले…

Ram Shinde elected as Maharashtra Legislative Council Chairperson : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या सभापतीपदीसाठी केवळ एकच अर्ज आला होता. त्यामुळे राम शिंदे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.
महाविकास आघाडीने या पदासाठी उमेदवार जाहीर केला नव्हता. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे देखील या पदासाठी इच्छुक होत्या. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून देखील हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपने हे पद स्वतःकडेच ठेवले आहे. याआधी विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली होती.
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘सभापतीपदासाठी निवडणूक असली तरीही एकमताने निवड करावी अशी उच्च परंपरा आहे. उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतल्याने त्यांचे आभार.’
‘प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. अतिशय शिस्तीने पण संवेदनशीलतेने सभागृहाचा कार्यभार चालवतील यात मला शंका नाही’, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राम शिंदे यांना विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. 2014 मध्ये निवडून आल्यानंतर मंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.





