सिंधुदुर्ग : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभारलं. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे अजूनही ठाम आहेत. यादरम्यान मनोज जरांगे आणि भाजपचे काही नेते यांच्यात मागच्या काही दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले नारायण राणे? ‘जरांगे म्हणाले राणे मराठवाड्यात येत असतील तर येऊ दे, आमच्याकडे काय पाहणार? आम्ही कपडे घालतो. तु कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढलेस तरी तसाच दिसतो. तुझ्यात आहे काय बघण्यासारख?’ असा हल्लाबोल नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे. विकासाच्या मुद्यावर एकत्र या इतक्या वर्षात बरेच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का, नाही होत छत्रपती. जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र या असे आवाहन यावेळी नारायण राणे यांनी केले. दरम्यान आता नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.