‘स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं’, गिरीश महाजन यांनी दिली कबुली

जळगाव : भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. “2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. वेळी मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं”, अशी कबुली त्यांनी दिली. जळगावच्या भाजपच्या समीक्षा बैठकीत त्यांनी आपल्या भाषणातून हि कबुली दिली.
उन्मेष पाटलांवर केली टीका
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमधून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर निशाणा साधला. “ज्यांना तिकीट मिळालं त्यांना तब्बल पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणलं. मात्र यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राचा बळीचा बकरा केला. काय झालं? अनेक जण म्हणत होते. मात्र या निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला”, अशी टीका गिरीश महाजन यांनी यावेळी केली.
एकनाथ खडसेंना लगावला टोला
“उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेला तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाचा भरोशावर आहोत. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे. मी मी म्हणणारे मी म्हणणारे आता कसे बसले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे. मात्र यांच्यावर बोलून मला आता तोंडही खराब करायचं नाही”, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता आमदार एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावल आहे.





