कर्नाटकातील भाजप नेत्या तेजस्वीनी गौडा पुन्हा कॉंग्रेस मध्ये..

नवी दिल्ली – कर्नाटकमधील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या नेत्या तेजस्विनी गौडा यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष नाही म्हणून मी त्यापक्षाचा त्याग केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
तेजस्वीनी गौडा या पुर्वाश्रमीच्या कॉंग्रेसच्या नेत्या आहेत. त्या २००४- ते २००९ या काळात कॉंग्रेसच्या खासदार होत्या. त्यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा पराभव केला होता. पण त्यानंतर त्यांनी सन २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आपले पुन्हा कॉंग्रेस मध्ये येणे ही आपली घरवापसी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला.
आपल्या वक्तव्यात गौडा म्हणाल्या, “काँग्रेस केवळ शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवते. कॉंग्रेसचा इतिहास पुन्हा पाहण्याची वेळ आली आहे, आणि पूर्ण प्रामाणिकपणे मला पक्षासाठी काम करायला आवडेल असे त्या म्हणाल्या.





