चंदीगड : भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यापासून तिकीट न मिळालेल्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी मंत्री बच्चनसिंग आर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. बच्चनसिंग आर्य हे जिंदच्या सफीदो येथून तिकीट मागत होते. भाजपने जेजेपीचे बंडखोर आमदार रामकुमार गौतम यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होऊन बच्चनसिंग यांनी राजीनामा दिला आहे. (Haryana Assembly Election 2024) मिळालेल्या माहितीनुसार, जेजेपीचे बंडखोर आमदार रामकुमार गौतम यांना सफिदो मधून तिकीट मिळाल्याने संतापलेल्या बच्चन सिंह आर्य यांनी चार ओळींचे राजीनामा पत्र लिहून प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली आहे. लगा दो आग पानी में…. शरारत हो तो ऐसी हो…. मिटा दो हस्ती जुल्मों की…. बगावत हो तो ऐसे हो। रणजितसिंह चौटाला यांनीही पक्ष सोडला – यापूर्वी सिरसा जिल्ह्यातील रानियाचे आमदार असलेले रणजित सिंह चौटाला यांनीही सैनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. रणजित सिंह चौटाला हे मनोहर लाल खट्टर आणि नायब सिंग सैनी या दोघांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीत हिस्सारमधून तिकीट दिले होते पण त्यांचा पराभव झाला. त्यांना यावेळी रानिया येथून तिकीट हवे होते पण भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. गुरुग्रामचे भाजप नेते जीएल शर्मा यांनीही पक्ष सोडला – गुडगाव विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजप नेते जीएल शर्मा यांनी शुक्रवारी त्यांच्या समर्थकांसह पक्षाचा राजीनामा दिला. शर्मा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी तिकीटाचे दावेदार भाजप नेते नवीन गोयल यांनीही त्यांच्या समर्थकांसह राजीनामा दिला होता. बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून राव नरबीर सिंग यांना दिलेल्या तिकीटाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चाही काढला. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. गोयल यांच्यासह 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला. अनेक नेत्यांनी केले बंड – हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदार लक्ष्मणदास नापा यांनीही पक्ष सोडला. पक्षाने त्यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केल्याने माजी मंत्री कर्ण देव कांबोज यांनीही भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.