PCMC News: डीपीवरील सुनावणी अंतिम टप्यात; ४९ हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण
डिसेंबरमध्ये आराखडा शासनाकडे जाणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारुप विकास योजना आराखड्यावर (डीपी) तब्बल ५६ हजार ७७१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यावर आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सुनावणी सुरू आहे.
सुनावणी अंतीम टप्प्यात आली असून आतापर्यंत ४९ हजार ५४२ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. नोव्हेंबरअखेर सुनावणी पूर्ण होऊन डिसेंबरमध्ये हा आराखडा शासनाकडे पाठविण्याची तयारी आहे.
महापालिकेकडून सुधारित प्रारुप विकास योजना आराखडा १५ मे २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आला. महापालिका आणि नवनगर प्राधिकरणाकडून वर्ग झालेल्या क्षेत्रासह एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर परिसराचा हा आराखडा आहे. सन २०३१ पर्यंत ४२ लाख ४० हजार आणि सन २०४१ पर्यंत ६१ लाख लोकसंख्या गृहीत धरून तो तयार करण्यात आलेला आहे.
त्यावर १४ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत ५६ हजार ७७९ जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास १५ मे २०२६ ला मान्यता मिळाली. या समितीमार्फत ३ ऑगस्ट २०२६ पासून आकुर्डीत सुनावणी सुरु आहे. गावनिहाय एकत्रित हरकतदाराचे म्हणने ऐकूण घेतले जात आहे.
आतापर्यंत पिंपरी, तळवडे, थेरगाव, रहाटणी, दिघी, मोशी, ताथवडे, सांगवी, भोसरी, डुडूळगाव, चिखली, पिंपळे सौदागर, चिंचवड, चोविसावाडी, वाकड, बोऱ्हाडेवाडी, पिंपळे निलख, वडमुखवाडी, निगडी, आकुर्डी, चऱ्होली आणि बोपखेल या २२ गावांची सुनावणी पूर्ण झाली. तर, येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पुनावळे,
किवळे, दापोडी, मामुर्डी, पिंपळे गुरव आणि रावेत या गावांमधील हरकतींवर सुनावणी पुर्ण केली जाणार आहे. सुनावणीला गैरहजर नागरिकांना सुनावणीअंती संधी दिली जाणार आहे. तसेच, शासकीय संस्थांच्या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिनाभरात राज्य शासनाकडे सादर होणार
आराखड्यावर कार्यवाही पूर्ण करण्याची बारा महिन्याची मुदत १४ मे २०२६ पर्यंतच होती. परंतु, पालिका निवडणुकीमुळे ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे आराखड्यावरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ घेण्यात आली आहे. आता १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सुनावणी पूर्ण करून पालिकेच्या मंजुरीने अंतिम मान्यतेसाठी हा विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
‘विकास आराखड्यावरील हरकतींची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. २२ गावांमधील ४९ हजार ५४२ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सुनावणी पुर्ण झाल्यानंतर समितीने सुचविलेल्या बदलांसह हा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल.’ – ललित खोब्रागडे, नगररचना उपसंचालक, पिंपरी-चिंचवड महापालिका.



