मुंबई पोलीस दलाचा भाजपकडून अवमान

मुंबई – सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास योग्यप्रकारे आणि वेगाने करावा, अशी अपेक्षा कॉंग्रेस पक्षाने व्यक्त केली आहे. तथापि, या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी काहीही चुकीचे केले नसल्याची बाबही निर्देशित केली आहे. त्याकडे भाजपने लक्ष द्यावे.
मुंबई पोलीस हे जागतिक दर्जाचे पोलीस दल आहे, केवळ कॉंग्रेस व शिवसेनेला विरोध करण्याच्या नादात त्यांनी या पोलीस दलाला अवमानीत केले आहे, अशी टीकाही कॉंग्रेसच्या वतीने त्यांचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांनी केली आहे.
बिहारमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी नितीशकुमार यांच्या सरकारने या प्रकरणाचा उपयोग करून घेतला आहे. तथापि, या प्रकरणाचा निकाल भाजप-जेडीयू नेत्यांच्या राजकीय स्वरूपाच्या वक्तव्यांच्या आधारावर लागणार नाही तर योग्यप्रकारे तपास केल्यानंतरच या प्रकरणाचा निर्णय लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
गोहील यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेऊन त्यांना अवमानीत केले आहे हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 35 पानी निकालपत्रात दहाव्या परिच्छेदात म्हटले आहे की, पोलिसांनी केसची डायरी कोर्टापुढे सादर केली आहे. मुंबई पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही. कोर्टाने असा स्पष्ट अभिप्राय दिल्यानंतर मुंबई पोलिसांना बदनाम केल्याप्रकरणी भाजप नेत्यांनी माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.
सुशांतसिंह प्रकरणाचा योग्य तपास करून त्यांच्या कुटुंबाला न्याय दिला जावा, अशी आमची पहिल्यापासूनची भूमिका होती. यात जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा दिली जावी, अशी आमचीही इच्छा आहे. त्यासाठी सीबीआयने याचा त्वरित व योग्य तपास केला पाहिजे. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्याच मार्गदर्शनाखाली सीबीआयने हा तपास केला पाहिजे अशी आमची मागणी होती, पण अशा स्वरूपाच्या तपासाला बिहारमधील नितीशकुमार सरकारचा विरोध होता असा आरोपही त्यांनी केला.





