भाजपने शेतकरी उद्ध्वस्त केला; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे पाप भाजपने केले, अशी टीका त्यांनी केली. आज पायाखालची वाळू सरकत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या गोष्टी करत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी कर्नाटक सरकारचे आमंत्रण स्वीकारावे आणि तिथे जाऊन आपले तोंड स्वच्छ करावे, असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला आहे.
अदाणींच्या इशाऱ्यावर महायुतीचे सरकार आले असावे, असेही वडेट्टीवार म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट-दोनपट भाव दिल्याचे म्हणत आहेत. पण हा भाव कुठे आहे? खोट बोलण्याची देखील एक सीमा असते. ज्यावेळी कापसाचे उत्पादन होते, त्यावेळेला हे कापूस आणि कापसाच्या गाठीची निर्यात करतात. सोयाबीनचे उत्पादन आल्यास सोयाबीन तेल परदेशातून आयात करतात.
भाताचे उत्पादन निघाल्यास निर्यात करताना एक्सपोर्टमध्ये 25 ड्युटी लावतात. हे सर्व काय चाललंय? यांना शेतकऱ्याला जगवायचे आहे की नाही? असा सवालही वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. भाजपने स्वत: शेतकरी विरोधी निर्णय घेऊनही महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे वाटोळे केले, असे नाक वर करून सांगत आहेत. उलट महायुतीने, नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांचे वाटोळे केले, असेही ते म्हणाले.





