BJP Gen Z Outreach : तरुण मतदारांसाठी भाजपची खास टीम; स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी
BJP Gen Z Outreach : Gen Z तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपने विशेष टीम तयार केली आहे. स्मृती इराणी, विनोद तावडे, नितीन नवीन यांच्यासह नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी.

BJP Gen Z Outreach : देशातील ‘Gen Z’ अर्थात नव्या पिढीतील तरुण मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपने विशेष टीम तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांना विद्यापीठे व शाळांमध्ये जाऊन तरुणांशी संवाद साधण्याच्या सूचना केल्यानंतर या अभियानाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
भाजपच्या सूत्रांनुसार, या विशेष आउटरीच टीममध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांचा समावेश आहे. छत्तीसगडचे मंत्री ओ.पी. चौधरी यांच्यासह अन्य युवा नेत्यांनाही या अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तरुणांच्या प्रश्नांवर थेट संवाद –
या अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या आकांक्षा, चिंता आणि अपेक्षा जाणून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये थेट संवादाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आगामी काळात या विशेष आउटरीच कार्यक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाचीही चर्चा –
दरम्यान, काँग्रेसकडूनही युवा मतदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यापूर्वी कोटा, देहरादून आणि प्रयागराज येथेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि वाढत्या शिक्षण शुल्कासह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमाला हजारो तरुण उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
भाजपचा काँग्रेसवर पलटवार –
राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाजपने टीका केली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘छात्रों की गूंज’ हे नाव केवळ नावापुरते असल्याचा दावा करत हा कार्यक्रम ‘पैशाची गूंज’ असल्याची टीका केली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देऊन गर्दी जमविण्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, काँग्रेसने भाजपचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीमची पहिली बैठक –
दरम्यान, शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची पहिली परिचयात्मक बैठक झाली. बैठकीची सुरुवात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सर्व सहा कडव्यांच्या गायनाने झाली. यावेळी वंदे मातरम्च्या सर्व कडव्यांच्या गायनासंदर्भात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच राष्ट्रगान केवळ पहिल्या दोन कडव्यांपुरते मर्यादित करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर भाजपने नाराजी व्यक्त करत त्याचा निषेध केला.





