नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यात भाजपला अपयश

नवी दिल्ली : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून एक कोटी सदस्य बनवण्याचे लक्ष्य गाठण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सदस्यत्व मोहीम सुरू केली होती आणि 25 सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 1 कोटी नवीन लोकांना पक्षात जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर सदस्यत्वाची जोरदार मोहीम सुरू केली. परंतु कोणतेही मोठे राज्य स्वत:साठी निर्धारित केलेले लक्ष्य पूर्ण करू शकले नाही. सदस्यत्वाच्या मोहिमेत उत्तर प्रदेश अव्वल आहे, परंतु लक्ष्य पूर्ण करण्याच्या बाबतीत त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांना यश आले आहे. केवळ या तीन राज्यांनी आपापल्या उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उर्वरित राज्यांच्या कामगिरीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या बातमीनुसार पाटणा येथे झालेल्या बैठकीत नड्डा यांनी बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जैस्वाल आणि राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना फटकारले. सम्राट चौधरी हे भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत. जुलैमध्ये दिलीप जैस्वाल यांना त्यांच्या जागी बिहार भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. बिहारला ६५ लाख नवीन सदस्य जोडण्याचे टार्गेट दिले होते मात्र त्यांनी केवळ ३२ लाखापर्यंतच मजल मारली. राजस्थानमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेसचा पराभव करून पक्षाने 115 जागा जिंकल्या होत्या. तेथे 55 लाखांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २६ लाख नवीन सदस्य जोडण्यात पक्षाला यश आले आहे. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूचे युतीचे सरकार आहे. तेथेही भाजप सदस्यत्व मोहिमेच्या लक्ष्यापेक्षा खूपच मागे पडले आहे.
दरम्यान, भाजपला संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तेलंगणासारख्या राज्यात केवळ 10 लाख नवीन सदस्य जोडण्यात यश आले आहे. या खराब कामगिरीमुळे संतप्त झालेल्या नड्डा यांनी राज्य युनिटला फटकारले आहे आणि त्यांना 77 लाखांहून अधिक सदस्य करण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी अलीकडेच हरिता प्लाझा येथे भाजपच्या सदस्यत्व मोहिमेत भाग घेतला, जिथे ते म्हणाले की सर्वात वाईट परिस्थितीतही, तेलंगणाला 50 लाख नवीन सदस्य निर्माण करावे लागतील.
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार एका माध्यमाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ आणि पक्ष संघटनेवर विश्वास ठेवते. त्यामुळेच आमच्यासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात आम्ही दोन कोटींचा आकडा गाठू, असा आम्हाला विश्वास आहे.





