‘आरएसएस हे विष’ म्हणणाऱ्या तुषार गांधींचा माफी मागण्यास नकार, अटकेच्या मागणीवर म्हणाले…

Tushar Gandhi | महात्मा गांधीजी यांचे पणतू तुषार गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी (आरएसएस) केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. तुषार गांधी यांनी आरएसएस हे विष असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि संघाकडून जोरदार टीका केली जात असून, त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे.
आपण भाजपचा पराभव करू शकतो. आरएसएस हे विष आहे. ते या देशाचा आत्माच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये दिवंगत गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमादरम्यान बोलताना केले होते.
एकीकडे या वक्तव्यानंतर भाजप आणि आरएसएसने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर तुषार गांधी यांनी आपले विधान मागे घेणार नाही व माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी तुषार गांधींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘तुषार गांधी योगायोगाने गांधी कुटुंबात जन्मले आहेत आणि ते महात्मा गांधींचे नाव वापरत आहेत. ‘पुतळ्याच्या अनावरणासाठी तुषार गांधींना बोलावणाऱ्यांना कदाचित त्यांचे विचार माहित नसतील.’ यावेळी त्यांनी तुषार गांधी यांच्या अटकेची मागणीही केली.
माफीच्या मागणीवर बोलताना तुषार गांधी म्हणाले की, ‘मी माफी मागणार नाही व विधानही मागे घेणार नाही. मी जेव्हा काही बोलतो, तेव्हा मी त्याबद्दल माफी मागावी लागेल किंवा ते विधान मागे घ्यावं लागेल असा विचार अजिबात करत नाही. या घटनेमुळे देशद्रोह्यांना उघडकीस आणण्याचा माझा निर्धार बळकट झाला आहे. हा लढा स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षाही महत्त्वाचा आहे. आता आपला एक समान शत्रू आहे, तो म्हणजे संघ.’





