पुणे जिल्हा | गुंजवणीच्या पाण्यासाठी भाजपाचा उमेदवार गरजेचा

सासवड, (प्रतिनिधी)- भारतातील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा निर्णय गेल्या ५०० वर्ष होत नव्हता. तो निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला. प्रभू रामचंद्रांचे मंदिर पूर्णत्वाला गेले. त्याच धर्तीवर आपल्या पुरंदर तालुक्यातील गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे,
हा मार्गी लावण्यासाठी विधानसभेत भाजपाचा उमेदवार असणे गरजेचे असल्याचे मत कात्रज दूध संघाचे माजी संचालक तथा पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष गंगाराम जगदाळे यानी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही लोक कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याचे सांगत होते परंतु आता कांद्याला ५० रुपये बाजार भाव मिळत आहे, हे आपण जनतेला सांगितले पाहिजे.
वर्षानुवर्ष काँग्रेस सरकार हे सत्तेवर होते. परंतु कोणत्याही मोठ्या योजना त्यांना आणता आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना आपण राबवत आहोत, ही योजना घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले.





