भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे वाटप; हातात ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल असलेला व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Local Body Elections 2025 | राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान चंद्रपूरच्या राजुरामधील पैसे वाटप केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भाजपच्या उमेदवाराकडून पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत 500 रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत निवडणूक विभागाकडे काँग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी तक्रार केली आहे. अमोल चिल्लावार हे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. चिल्लावार यांच्या घराच्या मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेडमधून हे वाटप होत असल्याचा दावा केला जात आहे. Maharashtra Local Body Elections 2025 |
भाजप उमेदवाराच्या घराच्या मागील शेडमधून पैसे वाटताना व्हिडीओ व्हायरल#viralvideo #Voting #ElectionUpdates pic.twitter.com/LZ4ZqCMrAI
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) December 2, 2025
व्हिडीओमध्ये चिल्लावार यांच्या हातात पाचशे रूपयांच्या नोटांचा बंडल दिसत आहे. रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली असल्याचे आणि ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुख यांच्याकडे पाठवल्याचे राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर नगरपरिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले.
बुलढाण्यातील नांदुरा येथील मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न
तर दुसरीकडे बुलढाण्यातील नांदुरा येथे देखील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काल रात्री प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याशिवाय पंढरपुरात आज पहाटे पोलिसांनी सुमारे ७ लाख रूपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. यावर आता काय कारवाई केली जाणार हे पाहावे लागणार आहे. Maharashtra Local Body Elections 2025 |
हेही वाचा:





