Bitcoin Fraud – बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान आकुर्डी येथे घडला आहे. आदिती मॅडम (मो. नं. ७२०८८३४३९७), शंतनु जाना (मो. नं. ८६५८०८२०८६), मॅनेजर अरुण रॉय (मो. नं. ७४७३९८६५२६), https://www.spiritfirecoin.com या वेबसाईटचा धारक, तसेच ‘BIG DEALS 746’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचे प्रशासक आणि संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. क्रांतीनगर, आकुर्डी येथील पुरुष फिर्यादी यांनी शुक्रवारी (दि. १३) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर लॉगिन केले असता आरोपींनी संपर्क साधून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर कोणत्या क्रिप्टोकरन्सीत किती रक्कम गुंतवायची व कोणत्या बँक खात्यात पैसे जमा करायचे याबाबत सूचना देण्यात आल्या. त्या सूचनांनुसार फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३१ लाख ३५ हजार ४० रुपये जमा करून घेण्यात आले.गुंतवणुकीवर १.४६ बिटकॉईन अथवा सुमारे ८८ लाख रुपयांची आभासी रक्कम खात्यात दिसत होती. मात्र प्रत्यक्ष रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यावर व्यवहार अडवण्यात आला. त्यानंतर ‘क्रेडिट स्कोअर कमी झाला’ आणि खाते अनफ्रीज करण्यासाठी आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली.