Bitcoin: बिटकॉइन वधारून पोहोचला एक लाख डॉलरवर

मुंबई – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बिटकॉनला वाढलेला पाठिंबा जगजाहीर आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन शेअर बाजार नियंत्रक पदावर म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन वर बिटकॉइन समर्थक पॉल अटकिन्स यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अगोदरच वधारत असलेल्या बिटकॉइनच्या दरात पुन्हा वाढ झाली असून आता एका बिटकॉइनचा दर एक लाख डॉलरच्या पुढे गेला आहे.
सध्या भारतासह अनेक देशांची बिटकॉइनला मान्यता नाही. त्यामुळे या क्रिप्टोचे व्यवहार मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जातात. अशा परिस्थितीत या क्षेत्रात मर्यादित गुंतवणूक होत आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण अध्यक्षपदावर आल्यानंतर या क्षेत्रावरील निर्बंध काढून टाकू आणि एक औपचारिक चौकट तयार करू असे जाहीर केले आहे.
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यापासून बिटकॉइनच्या दरामध्ये जवळजवळ 35 हजार डॉलरची वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी आपण अमेरिकेला क्रिप्टोची राजधानी करणार असल्याचे जाहीर केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अॅलॉन मस्क यांचाही क्रिप्टोकरन्सीला पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेत क्रिप्टोसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.





