“बालाकोट’च्यावेळीच ठेवली होती युद्धाची तयारी

– लष्कर प्रमुखांचा जनरल बिपीन रावत यांची माहिती

नवी दिल्ली – पाकिस्तान सैन्याने कोणत्याही प्रकारे केलेल्या जमिनीवरच्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आणि शत्रूच्या प्रदेशात लढाई करायला भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. बालाकोटच्या हल्ल्याच्यावेळीच पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून थेट कारवाईलाही भारतीय लष्कराची पूर्ण तयारी होती, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे.

लष्कर प्रमुखांनी आज लष्कराच्या संरक्षण सिद्धतेची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना दिली. पुलवामा हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्यासाठी केलेल्या “एअर स्ट्राईक’सारख्या वेगळ्या पर्यायांच्या तयारीचीही माहिती त्यांनी दिली. बालाकोटच्या हल्ल्याच्यावेळीच पाकिस्तानबरोबरच्या युद्धास लष्कर सज्ज होते, असे जनरल रावत यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सांगितले.

सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने 11हजार कोटी रुपयांच्या दारुगोळ्याच्या खरेदीचा करार केला आहे. एकूण दारुगोळ्यापैकी 95 टक्के दारुगोळा उपलब्धही झाला आहे. अत्यंत महत्वाची 7 हजार कोटींच्या शस्त्रास्त्रांचे 33 करारही लष्कराने केले आहेत. तसेच 9 हजार कोटींच्या आधुनिक शस्त्रांच्या खरेदी प्रक्रिया सुरू आहे.
पुलवामा येथे “सीआरपीएफ’च्या ताफ्यातील बस उडवून दिल्याने 40 जवान शहिद झाले होते.

त्यानंतर 12 दिवसांनी 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोट येथे हवाई दलाने “एअर स्ट्राईक’ करून जैश ए मोहंम्मदचे अड्डे उद्‌ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय लष्करी ठाण्यांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लढाऊ विमानांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि पाक विमानांना पिटाळून लावले.

भारतीय लष्कराने महत्वाची शस्त्रे आणि दारुगोळ्याच्या उपलब्ध साठ्यात गेल्या दोन वर्षात खूप सुधारणा केली आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हा साठा अपुरा असायचा. उरी हल्ल्यानंतर या उपलब्धतेबाबत सुधारणा करण्यात आली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात तिन्ही दलांच्या उपप्रमुखांना संरक्षणासाठी आवश्‍यक खरेदीसाठी अतिरिक्‍त आर्थिक अधिकारही देण्यात आले आहेत.

पुलवाम हल्ल्यानंतर सरकारने तिन्ही दलांना अशा खरेदीसाठी आपत्कालिन अधिकारांच्या वापराचीही मुभा दिली होती. तसेच लष्करी सामुग्रीच्या खरेदी प्रक्रियेतील नियमांचे अडथळेही सरकारने हटवले. जम्मू आणि काश्‍मीरबाबतच्या भारताच्या निर्णयावरील पाकिस्तानच्या तीव्र प्रतिक्रियेला लक्षात घेऊन लष्कराने ताबारेषेवर “हाय अलर्ट’ ठेवला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×