Bike Theft: चोरी झाली अन् अवघ्या ५ तासांत आवळल्या मुसक्या; ‘त्या’ एका गाडीमुळे समोर आलं मोठं रॅकेट
Bike Theft: बोरगाव पोलिसांच्या डीबी टीमची धडक कामगिरी; अतीत येथून चोरीला गेलेली बाईक अवघ्या ५ तासांत शोधली, ७ गुन्ह्यांची झाली उकल.

Bike Theft – बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल अवघ्या पाच तासांत शोधून काढत सराईत मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. संशयिताकडून सातारा व पुणे शहर परिसरातून चोरी केलेल्या तब्बल १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ३ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की युवराज कृष्णाजी लोहार (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांची मोटारसायकल (एमएच-११ सीएफ-५१८३) दि. २७ जून रोजी दुपारी अतीत (ता. सातारा) येथील श्री मोटारबॉडी वर्कशॉपसमोरून चोरीस गेली होती. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने संशयिताचा शोध सुरु केला.
संशयिताच्या ठावठिकाण्याबद्धल मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पाठलाग करून रविराज ऊर्फ बबलू विलास माने (वय २५, मूळ रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, सध्या रा. बिबवेवाडी, पुणे) याला चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान या संशयिताने सातारा तालुका तसेच पुणे शहरातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून विविध गुन्ह्यांतील दहा दुचाकी जप्त केल्या. यातील काही मोटारसायकलींबाबत बोरगाव (सातारा) मार्केटयार्ड, विश्रामबाग, स्वारगेट व शिवाजीनगर या पुण्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात हा संशयित सराईत वाहनचोर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पुणे शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रफिक काझी, हवालदार संतोष चव्हाण, संजय खाडे, नीलेश गायकवाड, दीपककुमार मांडवे, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, जगदीश कणसे, रफिक शेख, पोलिस शिपाई धीरज महाडिक, केतन जाधव, सतीश पवार, विशाल जाधव, दीपक देशमूख, समाधान जाधव, सुमित साळुंखे, अनिकेत यादव, ज्ञानेश ढाणे यांनी ही कारवाई केली.





