‘बाइक टॅक्सी’ प्रवाशांच्या फायद्याचीच ! शेकडो होतकरू तरुणांच्या हाताला मिळतेय काम

पिंपरी (संदीप घिसे) – अत्यंत कमी दरात, कमी वेळेत, शहरात हव्या त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी बाइक टॅक्सी अत्यंत उत्तम पर्याय प्रवाशांच्या हाती पडला आहे. या बाइक टॅक्सी सेवेला रिक्षा चालकांचा विरोध असला तरी यामुळे शेकडो तरुणांच्या हाताला कमी भांडवलामध्ये काम मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालकांची मनमानी सर्वांनाच ज्ञात आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारणी न करता मनमानी भाडे आकारणी करणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, चौकात वाहतूक कोंडी होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या करणे, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, आदी प्रकारांमुळे नागरिकांना शहरातील रिक्षा प्रवास शिक्षेसमान भासतो. परंतु नाइलाजास्तव रिक्षाने प्रवास करावा लागतो. या रिक्षांना उत्तम पर्याय ओला-उबेर यासारख्या कंपन्यांनी दिला आहे. यामुळे इच्छीत स्थळी जाण्यापूर्वीच तेथील भाडे किती होईल, हे ऍपद्वारे सांगितले जाते. यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांची लूट कमी झाली आहे. जर ओला-उबेरकडून येणाऱ्या रिक्षा चालकांना भाडे परवडत असेल तर शहरातील इतर रिक्षा चालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी का करतात, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
पालकांचा भार कमी करते बाइक
नाशिकहून उच्च शिक्षण घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आलेला राजेश हा कॉलेज संपल्यावर बाइक टॅक्सी चालवतो. त्यांचे आई-वडील शेतकरी आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा खर्च आपणच करावा, असा त्याचा मनोदय आहे. असे शेकडो तरुण पार्ट टाइम बाइक टॅक्सी चालवितात. यामध्ये काही कामगारांचाही समावेश आहे. कामावर जाण्यापूर्वी किंवा कामावरून आल्यावर हे तरुण अधिकचे काम करीत आपल्या कुटूंबाला हातभार लावतात. याशिवाय घर ते कॉलेज आणि शिकवणीला जाण्यासाठी या बाइकचा वापर करतात.
पोलीस पडताळणी गरजेची
सध्या रॅपिडो कंपनीने ऍपच्या माध्यमातून बाइक टॅक्सी सेवा सुरू केली असली तर आगामी काळात ओला-उबेर या कंपन्यांकडूनही बाइक टॅक्सी सेवा देण्याचा मानस आहे. मात्र काही बाइक टॅक्सी चालक नियमांचे पालन करीत नाहीत. दुचाकी चालविताना स्वतः देखील हेल्मेट घालत नाहीत. तसेच रिक्षा चालकही अनेकदा या बाइक टॅक्सी चालकांशी हुज्जत घालतात. प्रसंगी मारहाणही करतात. राज्यात बाइक टॅक्सी चालकांकडून काही गैरप्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र बाइक टॅक्सीची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.
दरात मोठी तफावत
प्रवाशांनाही ही सेवा अत्यंत किफायरशीर आहे. केएसबी चौकातून चिंचवडगावात जाण्यासाठी रिक्षा चालक मीटरशिवाय दीडशे रुपये सांगतात. तर ऍपद्वारे रिक्षा बुक केल्यस 90 रुपये लागतात. मात्र बाईक टॅक्सीद्वारे याच अंतराकरिता केवळ 64 रुपये लागतात. याशिवाय बाईक टॅक्सीमुळे वाहतूक कोंडीचाही कमी प्रमाणात त्रास होतो.





