बिहार विधानसभा अध्यक्ष नितीश कुमार अन् भाजपसाठी का डोकेदुखी ठरतायेत?

Bihar Political Updates – बिहारमध्ये राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. नितीश कुमार यांनी नुकतेच राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतचा संसार मोडून पुन्हा एकदा भाजपसोबत घरोबा केला आहे. भाजप-जनता दल युनायटेडच्या सरकारमध्येही मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमार यांच्याच गळ्यात पडली आहे.
नितीश कुमार यांनी, ‘भाजप’सोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा हा प्रवास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यांच्या नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे असून यासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली आहे. बहुमत चाचणीमध्येच नितीश कुमार अन् भाजपचे सरकार तारणार की बुडणार हे स्पष्ट होणार आहे.
काय सांगतात आकडे? | Bihar Political Updates
नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाचे बिहार विधानसभेमध्ये ४३ आमदार आहेत. मित्रपक्ष भाजपचे ७४ आमदार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्या पक्षाचे ७५ आमदार आहेत. काँग्रेस आमदारांची संख्या १९ आहे.
बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ असून नितीश कुमार यांच्याकडे मित्रपक्षांसह १२८ आमदारांचा पाठिंबा आहे.
गाडं आडतंय कुठं? | Bihar Political Updates
नितीश कुमार बहुमताचा आकडा सहज पार करत असल्याचे दिसत असले तरी काँग्रेस नेते वेगळाच दावा करत आहेत. नितीश कुमार बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत असा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील, खेळ होणं बाकी असल्याचा सूचक दावा केला होता.
काँग्रेसतर्फे बहुमताबाबत दावा करण्यात येत असला तरी, घोडेबाजाराच्या भीतीने काँग्रेसने आपल्याच १६ आमदारांना बहुमत चाचणीपूर्वी हैदराबादला हलवले आहे.
पडद्यामागे कोणत्या हालचाली? । Bihar Political Updates
काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाकडून पडद्यामागे हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. नितीश कुमारांच्या पक्षाचे १२ आमदार फोडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे.
जनता दलाच्या आमदारांना मंत्रीपदे तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारीचे वायदे केले जात असल्याचीही माहिती सुत्रांकरवी मिळत आहे.
अवध बिहारी चौधरी खेळ करणार? | Bihar Vidhansabha Adhyaksha Avadh Chaudhari
नितीश कुमार यांनी राजद व काँग्रेससोबतचे आपलेच सरकार उलथवून लावले असले तरी विधानसभा अध्यक्षपदावर राष्ट्रीय जनता दलाचे अवध चौधरी कायम आहेत. आपण १२ तारखेपूर्वी म्हणजेच बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यामुळे बिहारमध्ये देखील विधानसभा अध्यक्ष सत्तासंघर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचेच अधोरेखित होत आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या आडून राष्ट्रीय जनता ‘खेळ’ करणार असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी गटाकडून चौधरी यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव देखील आणला आहे.
बिहारमधील या सर्व राजकीय घडामोडी पाहता, सत्ताबदलाचा यंदाचा डाव अद्याप संपला नसल्याचे चित्र दिसत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या
भाजपसोबत जाताच बदलले नितीश कुमारांचे बोल, अर्थसंकल्पाबाबत म्हणाले…
Nitish Kumar : राहुल गांधींनी जातीय जणगणनेचे श्रेय घेतल्याने नितीशकुमार संतापले ; म्हणाले,”यापेक्षा फालतू…”





