Bihar News: श्रावण सोमवारनिमित्त सिद्धनाथ मंदिरात तुफान गर्दी; चेंगराचेंगरीत ७ जण ठार

Bihar News – बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा महिलांसह किमान सात जण ठार आणि १६ जण जखमी झाले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. प्यारे पासवान (30), निशा देवी (30), पुनम देवी (30), निशा कुमारी (21) आणि सुशीला देवी (64) अशी मृतांची नावे आहेत. एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
जखमींवर सर्वोत्कृष्ट उपचार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जखमींना मुकुंदापूर आणि नजीकच्या परिसरातील वैद्यकीय सुविधांमध्ये नेण्यात आले, १० जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आणि सहा जण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.
यात्रेकरूंची वर्दळ जास्त असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मंदिरात तैनात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले की कावड यात्रेकरूंमधील वादामुळे ही चेंगराचेंगरी झाली असावी. नेमके कारण अद्याप स्पष्ट व्हायचे असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही स्थानिकांनी सांगितले की मंदिराबाहेर कावड यात्रेकरू आणि फूल विक्रेते यांच्यात झालेल्या जोरदार वादामुळे ही घटना घडली असावी. प्रशासन मृतांच्या कुटुंबियांना अंतिम संस्कारासाठी प्रत्येकी २० हजार रुपयेही देणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.




