Bihar Election : महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचा जावई बिहार निवडणूक लढवणार

पाटणा : माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे राजकीय नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. बिहारमधील विधानसभेच्या २ जागांवर ते अपक्ष म्हणून लढणार आहेत. लांडे यांनी मागील वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी बिहारच्या पोलीस दलात विविध पदांवर कार्य केले. उल्लेखनीय सेवेमुळे ते लोकप्रिय अधिकारी ठरले.
स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजकारणात सक्रिय होण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, चालू वर्षी एप्रिलमध्ये हिंद सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. मात्र, त्या पक्षाची अद्याप निवडणूक आयोगाकडे नोंदणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे लांडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उडी घेण्याची तयारी चालवली आहे.
अररिया आणि जमालपूर (मुंगेर) या मतदारसंघांमधून त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. अररिया, मुंगेर या दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी याआधी कार्य केले. धडाकेबाज कार्यशैलीमुळे त्यांना बिहारचे सिंघम म्हणून ओळखले गेले. ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीकडे बिहारप्रमाणेच महाराष्ट्राचेही लक्ष असेल.





