Bihar Election : बिहारसाठी कॉंग्रेसची छाननी समिती स्थापन; सदस्यांमध्ये प्रणिती शिंदेंचा समावेश

नवी दिल्ली : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने छाननी समिती स्थापन केली. ज्येष्ठ नेते अजय माकन यांना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनाही स्थान मिळाले आहे. बिहारमध्ये चालू वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल. ती जवळ येऊन ठेपल्याने इतर पक्षांप्रमाणेच कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेसने उमेदवारांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन केली. ती समिती संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस करेल. त्या नावांचा विचार करून पक्षश्रेष्ठी उमेदवारांची अंतिम निवड करतील. समितीच्या इतर सदस्यांमध्ये खासदार इम्रान प्रतापगढी, पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार, प्रभारी कृष्णा अल्लवारू आदींचाही समावेश आहे.
कॉंग्रेस बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीचा घटक आहे. राजदच्या नेतृत्वाखालील त्या महाआघाडीने मागील विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एनडीएला कडवी झुंज दिली. मात्र, काठावरचे बहुमत मिळवत एनडीएने सत्ता राखली. त्यावेळी महाआघाडीतील इतर घटक पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसची कामगिरी सुमार ठरली. त्यामुळे यावेळी कामगिरी उंचावण्याचे आव्हान कॉंग्रेसपुढे असेल.





