नागपूर: उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ (NH-44) वर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तब्बल ३० किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहनांची रांग लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तातडीने महामार्ग सायंकाळी ६ वाजेपर्यंत रिकामा करण्याचे आदेश देऊनही आंदोलक नागपूर-वर्धा मार्गावर ठामपणे उभे राहिले आहेत. बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली ‘महा एल्गार मार्च’- प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा पूर्णपणे हटवावा यासह अन्य मागण्यांसाठी ‘महा एल्गार मार्च’ ची घोषणा केली होती. मंगळवारी हजारो शेतकरी २५० ते ३०० ट्रॅक्टरसह नागपूर-वर्धा महामार्ग (NH-44) वर पोहोचले. या आंदोलनामुळे बुधवारीही रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी कायम राहिली, ज्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. कोर्टाचा आदेश आल्यानंतर आंदोलनाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुंबई-नागपूर महामार्गावरून शहराच्या दिशेने कूच केली, ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. हायकोर्टाने घेतली गंभीर दखल – राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील या अभूतपूर्व कोंडीची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वतःहून (suo motu) घेतली. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रिकामा करावा, असा आदेश दिला. कोर्टाने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी फक्त २४ तासांसाठी देण्यात आली होती आणि निर्धारित वेळेनंतरही हे धरणे सुरू ठेवणे योग्य नाही. सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी हजर – दरम्यान, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दोन राज्यमंत्र्यांना – आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांना – शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून मंत्री पंकज भोयर यांनी यावेळी आंदोलकांना विनंती केली की आम्हाला आणखी वेळ द्यावा तसेच हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. परंतु, आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारला माहीत आहे आणि ती मागणी म्हणजे कर्जमाफीची. यावर निर्णय देणार असाल तर या चर्चेला अर्थ असल्याचे यावेळी कडू यांनी म्हटले. यावर पंकज भोयर यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करू, अशी विनंती केली. याला देखील बच्चू कडू यांनी विरोध केला. बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आत्ता फोन लावा आणि विचारा कर्जमाफी देणार का? मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात अर्थ काय? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. मात्र, यावर अद्याप कुठलाही ठोस निर्णय शिष्टमंडळाने घेतला नाही. बच्चू कडू व आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर शिष्टमंडळ निघून गेले आहे. त्यामुळे या आंदोलनावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आत्ता फोन लावा आणि विचारा कर्जमाफी देणार का? मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात अर्थ काय? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. मात्र, यावर अद्याप कुठलाही ठोस निर्णय शिष्टमंडळाने घेतला नाही. बच्चू कडू व आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर शिष्टमंडळ निघून गेले. मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची फोनवरून चर्चा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. आता शिष्टमंडळ पुन्हा बच्चू कडुंच्या भेटीला आले असता पंकज भोयर म्हणाले, उद्या म्हणाले तर उद्या बैठक करू. या बैठकीत कर्जमाफीवर सुद्धा चर्चा करू. यावेळी सगळे अधिकारी तिथे उपस्थित असतील. तुमच्या सगळ्या मुद्यांवर चर्चा होईल, अशी ग्वाही भोयर यांनी यावेळी दिली. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बच्चू कडू यांनी फोनवरून चर्चा केली. बच्चू कडू उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट बच्चू कडू म्हणाले, आपण आंदोलन थांबवणार नाही. आपली मागणी आहे कर्जमाफीची. सरकार म्हणत आहे की कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगणार. आपले आंदोलन कशासाठी आहे, तारखेसाठी आहे. कर्जमुक्तीची तारीख पाहिजे. जर सरकारने तारीख दिली नाही तर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचे नाही. आपले आंदोलन बंद पडणार नाही. अजून आपण निर्णय घेतलेला नाही. दोन मंत्री इथे आले, त्यांचे म्हणणे असे आहे की आपले बाकीचे जे मुद्दे आहेत, त्यावर चर्चा करू. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आपण रेल्वेवर बसणार. तुमच्या मनात किंतु परंतु असेल तर बोला. आमच्या मागे पोलिसांनी तुम्हाला काही केले तर आम्ही मंत्र्यांच्या घरात जाऊन बसणार. तसेच कोणाच्याही गाड्या अडवू नका, अशी विनंती कडू यांनी आंदोलकांना केली आहे. तसेच आता बच्चू कडू उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी, पृथक विदर्भ आंदोलनाचे नेते वामनराव चटप आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर हेही सहभागी झाले आहेत.