Video: “मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी, आई मेली तरीही चालेल…”; शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

मुंबई: आगामी मुंबईसह महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद चांगलाच पेटला असताना, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या एका विधानामुळे या वादात अधिक तेल ओतले गेले आहे. सुर्वे यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी मरायला नको. कारण मावशीचं जास्त प्रेम असतं.” असे धक्कादायक विधान केले आहे.
या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादात मोठी भर पडली असून, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना आयते कोलीतच मिळाले आहे.
मनसेचा जोरदार प्रहार –
प्रकाश सुर्वे यांचा हा व्हिडिओ मनसे नेते नयन कदम यांच्याकडून लगेचच ट्विट करण्यात आला आहे. नयन कदम यांनी सुर्वे यांच्यावर जोरदार टीका करत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, “मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? ‘मराठी मेली तरी चालेल’ स्वतःच्या आईला मारून यूपीची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध!”
https://t.co/Ql4UJ1K9Om
फेसबुक शेवट बघा. मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का ?
“मराठी मेली तरी चालेल” स्वतःच्या आईला मारून यूपी ची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध.@mnsadhikrut @RajThackeray @News18lokmat @TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @LokshahiMarathi pic.twitter.com/PJz8UZd1XK— Nayan Kadam (@Nayan7217_) November 3, 2025
सुर्वे यांनी उत्तर भारतीय समुदायाला उद्देशून हे विधान केले असले, तरी “आई मेली तरी चालेल” या वक्तव्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात वाद झाला असतानाच, आता सुर्वे यांच्या या विधानाने शिंदे गटाची मोठी अडचण वाढण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.





