Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार फुटणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी
Maharashtra Politics : दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीत पक्षातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील सहा खासदारांना आपल्या गटात आणल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार असल्याचे बोलले जात आहे. अखेर या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे नवरात्रीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीत पक्षातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे गटातील काही आमदारांची चाचपणी सुरू आहे. तब्बल १४ आमदारांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांकडे आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
चर्चा अंतिम टप्प्यात
या संभाव्य पक्षप्रवेशाच्या बदल्यात काही आमदारांनी मंत्रिपदांसह सरकारमधील महत्त्वाची खाती मिळण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्यापैकी सहा आमदारांना चांगली खाती आणि मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही जणांना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रिपद देण्याबाबतही पक्षांतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया देत १४ आमदार फुटणार असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, राज्यासमोर सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटीसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. सरकारने या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे कैलास पाटील यांनी म्हटले.
आमदार कैलास पाटील म्हणाले…
“ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. आधी आपल्या आमदारांना न्याय द्या. आमचे १४ आमदार फुटणार नाहीत. असं काहीही होणार नाही,” असे कैलास पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे एकीकडे ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून मात्र या शक्यता स्पष्टपणे फेटाळल्या जात आहेत. आता मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे कोणती रणनीती आखतात आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






