Bigg Boss OTT 2 : “वयाच्या ४४ व्या वर्षी सोडली दारू”; बिग बॉसच्या घरात अभिनेत्री पूजा भट्टचा खुलासा

मुंबई – ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत असल्याने चाहतेही खुश आहेत. मागील वर्षी हा शो दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला होता. पहिल्या भागाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर अनेकजण या शोच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर हा शो 17 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात एकापेक्षा एक दमदार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. नुकतेच तिने एका एपिसोडमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. पूजा भट्टने वयाच्या 44 व्या वर्षी दारूचे व्यसन सोडल्याबाबत भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मला दारूचं प्रचंड व्यसन होते. पण मी ते कधीच लपवून ठेवले नाही. उलट सगळ्यांसमोर मान्य केलं. यानंतर मी दारू सोडण्याचा निश्चय केला. मी वयाच्या ४४ व्या वर्षी दारू सोडली.”
यावेळी तिने आपला समाज दारूचं व्यसन असलेल्या स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, याबद्दलही भाष्य केले आहे. “पुरुषांना दारुचं व्यसन असेल तर ते खुलेआम यावर बोलतात. त्यातून बाहेर पडताना ते कधीच विचार करत नाहीत की समाज काय म्हणेल. पण महिला खुलेआम दारु पीत नाहीत म्हणूनच त्या खुलेआम दारुचं व्यसन सोडू शकत नाहीत. मी मात्र जगासमोर न लाजता दारु प्यायचे. म्हणूनच मला दारुचं व्यसन लागलं ही गोष्ट मी स्वीकारली आणि दारु सोडण्याची गोष्ट सर्वांसमोर मान्यही केली.”
व्यसनाच्या सवयीमुळे पूजा भट इंडस्ट्रीमधून गायब झाली होती. तिने ‘सडक’,’ दिल है के मानता नही’ या चित्रपटात काम केले. शेवटची ती ‘सडक 2′ सिनेमात पाहायला मिळाली. दरम्यान, बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिबांग, पूजा भट्ट, अजय जडेजा, सनी लिओनी, मुकेश छाब्रा, एमसी स्टॅनसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.





