पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट; लवकरच न्यायालयात प्रकरणाची सुनावणी, कोण आहेत सरकारी वकील?

Pune Kalyaninagar accident case | पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श अपघात प्रकरणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. हे अपघात प्रकरण खूप चर्चेत राहिले होते. कल्याणीनगर रस्त्यावर पोर्श कारने धडक दिल्याने दोन आयटी अभियंता तरुणांचा जागीच मूत्यू झाला होता. मंद्यधुद अवस्थेत या रस्त्यावरून भरधाव वेगाने पोर्श कार चालवणाऱ्या १७ वर्षीय मुलाने या दोघांना जोराची धडक दिली होती.
या प्रकरणात आता सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणाची लवकरच न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. एक प्रकरण बाल न्यायालयामध्ये, तर दुसरे प्रकरण शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते. अपघात प्रकरण झाल्यानंतर रक्तातील अल्कोहल प्रमाण तपासण्यासाठी दिलेल्या रक्ताचे नमुने बदलले गेले होते. डॅाक्टरांना हाताशी धरून या गोष्टी करण्यात आल्या होत्या, असे पोलिसांना केलेल्या तपासात समोर आले होते. अल्पवयीन मुलाचे आईवडील आजोबा यांचा सहभाग यामध्ये असल्याचे समोर आले होते. आरोपीला वाचण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॅाक्टरांनाही अटक करण्यात आली होती.
यंत्रणांना हाताशी धरुन घराच्या व्यक्तींनी पुरावे बदलण्यासाठी बराच आर्थिक व्यवहारही केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच सत्र न्यायालयातील खटल्याची सुनावणी होणार आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे हे असणार आहेत.
प्रकरण काय होते?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत पोर्श कारने कल्याणीनगर भागात दोन आयटीत काम करणाऱ्या अनिश अवधिया वय 27 वर्षे आणि अश्विनी कोष्टा यांना जोराची धडक दिली होती. हा अपघात इतका भयानक होता की हे दोघेही हवेत उडून रस्त्यावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेनंतर स्थानकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातूरमातून शिक्षा दिल्या आणि जामीन मंजूर केला होता. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रक्रिया उमटल्या होत्या.





