प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा प्रतिस्पर्धी पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज भरत पक्षश्रेष्ठींनाच मोठा धक्का दिला आहे.अनपेक्षितरीत्या वाढलेल्या बंडखोरीमुळे पक्षांच्या रणनीतीत गोंधळ निर्माण झाला असून, या नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा गाठीशी बांधण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.बंडखोर उमेदवारांना पटवण्याचे प्रयत्न वाढल्याने त्यांचाही भाव चढू लागला आहे. काहीजणांना पक्षांतर्गत मोठ्या आश्वासनांची रीघ लागली असून, बंडखोरांना आपलेसे करण्यासाठी नेते व्यक्तिगत भेटी, चर्चा, मध्यस्थी अशा विविध उपाययोजना करत आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार दि.२१ रोजी असल्याने सर्वच पक्षांना निवडणूक समीकरणे सांभाळणे आणि बंडखोरांना परत आणणे ही मोठी कसरत बनली आहे.राजकीय हालचालींनी संपूर्ण तालुक्याचे लक्ष मंचरकडे लागले असून, प्रभागनिहाय पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. बंडखोर शांत होणार की आपल्याच उमेदवारीवर ठाम राहणार, यावर निवडणूक राजकारणाचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.