बाबांना कडक सॅल्यूट! 78व्या वर्षी 50 किलो वजन उचलून जिंकली स्पर्धा, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

पुणे – सातत्याने केलेला व्यायाम आणि सरावामुळे शरिर किती तंदुरुस्त राहते याचा प्रत्यय पुणे शहरात आला आहे. येथिल श्रीकांत आडकर (वय 78, पुणे) यांनी वयाच्या 78व्या वर्षी 50 किलो वजन उचलून पाॅवरलिफ्टिंगची स्पर्धा जिंकली आहे. या यशाने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आकडर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली आहे.
आडकर सांगतात की, सातत्य आणि शिस्त बाळगली की कोणतेही यश संपादन करणे सोपे होते. माझं वय 78 असून मी नोकरी करायचो. लहानपणापासूनच मला खेळाची आवड होती. मी नियमित व्यायाम करतो. व्यायामासोबतच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाॅवरलिफ्टिंगचा व्यायामही करायचो. त्याचेच फळ म्हणजे आज मिळालेले यश आहे. वयाच्या 78 व्या वर्षी पॉवरलिफ्टिंग करणे माझ्यासाठी आव्हान होते. वयामुळे शरीरात मोठे बदल होत असतात. हाडेदेखील ठिसूळ होतात. त्यामुळे मणक्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. माझ्या प्रशिक्षकाने माझा रोज सराव करुन घेतला. त्यानंतर त्यांना माझ्या आरोग्याचाही अंदाज आला. माझ्या सरावाचा योग्य आढावा प्रशिक्षक रोज घेत होते. त्यांनी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष दिले आणि मी स्पर्धेत उतरलो आणि जिंकलोदेखील.
दरम्यान, वयाच्या 78व्या वर्षी अशक्य गोष्ट शक्य केल्याने आडकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.





