ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मोठा दिलासा

मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह लेख लिहिल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला होता. तथापि आता पोलिसांनी त्यांच्यावरील हे गुन्ह्याचे कलम वगळले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर अभिप्राय मागवल्यानंतर आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर राऊत यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप वगळण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांनी ‘सामना’मधील राऊत यांच्या साप्ताहिक कॉलममध्ये पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या कथित वक्तव्याबद्दल ११ डिसेंबर रोजी विविध कलमांसह देशद्रोहाचे कलम लागू केले होते. भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.





