रवींद्र वायकर यांना ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा; कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद

Jogeshwari Land Case | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याने आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा वायकर यांना मिळाला आहे.
माजी मंत्री रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि आता विधानसभेच्या उमेदवार असलेल्या मनिषा वायकर यांच्यासह काही साथीदारांवर जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. यासंबंधी परवानगी त्यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते.
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत होती. वायकर आणि त्यांच्या पत्नीसह अन्य भागीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी पालिकेने केली होती. मात्र मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल कोर्टात दाखल केला होता. आता हा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात ४८ मतांसह त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला.
हेही वाचा:
झाशीच्या मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वॉर्डात भीषण आग ; 10 अर्भकांचा मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी





