Eknath Shinde : मोठा राजकीय भूकंप! तब्बल 25000 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात शिवसेनेने मोठी राजकीय खेळी खेळली आहे.

Eknath Shinde : राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असून महायुतीमध्ये जागावाटपावरून खलबते सुरू आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवर एकमत होत नसल्याने जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे. या राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात शिवसेनेने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. गुरुवारी अहमदपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात तब्बल 25 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जात आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळापासून लातूर हा काँग्रेसचा मजबूत गड राहिला आहे. मात्र, या मोठ्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा : 108 Ambulance Station : मोरगावच्या १०८ रुग्णवाहिका स्टेशनला हिरवा कंदील; रोहिणी कदम यांच्या पाठपुराव्याला यश
या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. “विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल, तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा,” असे खुलं आव्हान त्यांनी दिलं. शिवसेनेत दाखल झालेली लोकं कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे, तर पक्षावरील प्रेमामुळे एकत्र आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“मराठवाडा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, शिवसेनेला सर्वत्र मोठं प्रेम मिळत आहे. एकदा शब्द दिला की तो पाळतोच,” असे म्हणत शिंदे यांनी आपल्या नेतृत्वशैलीचाही उल्लेख केला. गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेत पक्षप्रवेशाची मालिका अखंड सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. “आमचा अजेंडा सत्ता किंवा खुर्ची नाही, तर जनतेची सेवा हा आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
२०२९ च्या तयारीला सुरुवात
दरम्यान, राज्यातील प्रमुख निवडणुका पार पडल्यानंतर आता शिवसेनेने संघटनाबांधणीवर मोठा भर दिल्याचे दिसून येत आहे. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला, तरी पक्षविस्तारासाठी शिंदे गटाने आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना पक्षात सामावून घेण्याची मोहीमही वेगाने सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे देखील ‘शिवसंवाद दौऱ्या’द्वारे मराठवाड्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय झाले आहेत.






