पुणे | खरेदीसाठी मोठ्या रकमेसाठी मोठा प्लन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवाळीला गावी जाण्याआधी बडी रक्कम हातात पडावी म्हणून कट रचून उत्तर प्रदेशातील दोघांनी एका गोडावूनमधून तब्बल २८० लॅपटॉप चोरले. या कटात त्यांनी आणखी काही जणांना सामिल करून घेतले. मात्र, मोठी रक्कम हातात पडण्याएवजी बेड्या पडल्या. चोरट्यांना आता दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.
वाघोली परिसरातील एक गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल २८० लॅपटॉप चोरले. वाघोली पोलीस ठाण्याचे कामकाज नुकतेच सुरू होताच ही घटना घडली. यामुळे वाघोली पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी प्राथमिक तपास करुन गोडाऊनमधील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
यानंतर अधिक तपासात त्यांना चोरी करताना सीसीटीव्ही कोणीतरी बंद केल्याचे आढळले. यामुळे गोडावूनमधील कर्मचारी सहभागी असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले.
त्यांनी मुख्य आरोपी सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा.होलवड, उत्तरप्रदेश) यांचा माग काढला. तेव्हा तो उत्तर प्रदेशला गेल्याचे आढळले. जाताना त्यांनी भाड्याच्या घरातील त्याचे कोणतेही सामान सोबत नेले नव्हते.
यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांचा शोध घेण्यात आला. शिवाजी जगन्नाथ वसू (वय २७, रा.छ.संभाजीनगर) आणि कुमुद रंजन झा (वय ३२,रा.वाघोली) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांच्याही पिकअप आहेत.
त्यांनी गोडाऊनमधील माल छत्रपती संभाजीनगर आणि तेथून प्रयागराज येथे नेण्यास मदत केली होती. यानंतर सुरेश कुमार याला उत्तरप्रदेशातून परत येताना औरंगाबाद येथे ताब्यात घेण्यात आले. या तीघांनाही अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त(परिमंडळ ४) हिंम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, पोलीस अंमलदार अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दिपक कोकरे, प्रतिम वाघ, महिनिनाथ बोयने यांच्या पथकाने केली.
वीस हजारांत ९ लॅपटॉप विकले…
सुरेश कुमार दोन महिण्यापूर्वीच अर्कलाईन लॉजिस्टीक ॲण्ड वेअर या गोडाऊनमध्ये मजूर म्हणून कामाला लागला होता. त्याचा मित्र तेजप्रकाश हा एका फर्निचरच्या कारखान्यात कामाला आहे.
दोघांनी कट रचून माल वाहण्यासाठी ओळखीच्या वसु आणि झा या पिकअप चालकांशी संपर्क साधला. औरंगाबादपर्यंत गाडी गेल्यावर त्यांच्याकडील पैसे संपले. यामुळे त्यांनी एका छोट्या दुकानदाराला अवघ्या वीस हजारात ९ लॅपटॉप दिले.
आणखी एकाला ९ लॅपटॉप दिले. तर रस्त्यात भेटणाऱ्या काही वाहन चालकांनाही एक दोन लॅपटॉप हजार दोन हजारात विकले. लॅपटॉपचा माल गाडीतून उतरवणाऱ्यालाही मजुरी म्हणून लॅपटॉप देऊन टाकला. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन पिकअप गाड्या असा १ कोटी एक लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.



