तेलंगणात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळीही जोरात

हैदराबाद – तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तब्बल 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरुन 61 करण्यात आले असल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले.
चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सकाळी विधानसभेत ही घोषणा केली आहे. यापूर्वी तेलंगणा सरकारने 2014 मध्ये सरकारी कर्मचाऱ्याचें वेतन 43 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती.
मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य सरकारचीही आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या निर्णयाला अजून वेळ लागला. आता परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळीही जोरात!
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही सरकारने स्पेशल फेस्टिव्हल ऍडव्हान्स स्कीमची घोषणा केली आहे. या स्कीममध्ये सरकारने 10 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आता सणावारांसाठी 10 हजार रुपये ऍडव्हान्स घेऊ शकतात. त्यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.





