शिवप्रेमींसाठी मोठी बातमी! तुळापूर-वढूला थेट जोडणाऱ्या पुलाला मंजुरी; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) आणि समाधी स्थळ वढू (बु.) (ता. शिरुर) यांना थेट जोडणाऱ्या रस्ता व पुलाच्या कामास मान्यता देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवन, नागपूर येथे राज्यातील वढू–तुळापूर विकास आराखड्यासंदर्भातील शिखर समितीची बैठक झाली.
यामध्यये हा निर्णय घेण्यात आला. याबैठकीस बैठकीस आमदार ज्ञानेश्वर कटके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या वढू–तुळापूर विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.यापूर्वी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखडा या २८२.२४ कोटी रुपये किंमतीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली होती.
भीमा नदीवर तुळापूर–वढू (बु.) आपटी येथे पूल बांधणे व सद्यस्थितीतील आपटी–वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण करणे, या २५०.२७ कोटी रुपये किंमतीच्या कामास मंजुरी देण्यात आली. नव्याने मंजूर झालेल्या रस्ता व पूल बांधकामामुळे एकूण सुधारित आराखड्याची किंमत ५३२.५१ कोटी रुपये इतकी झाली आहे.
नवीन रस्ता हा तुळापूर येथील बलिदानस्थळ व वढू (बु.) येथील समाधी स्थळास थेट जोडणारा ग्रीनफील्ड मार्ग असणार आहे. या रस्त्यामुळे शिवप्रेमी भक्त व भाविकांसाठी सुकर, सोयीस्कर व थेट दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आदर म्हणून हा रस्ता हेरिटेज वॉक स्वरूपात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सुविधादेखील समाविष्ट करण्यात आली असून येथून आराखड्यातील प्रस्तावित म्यूरल्स, पुतळा व इतर कलाकृतींचा देखावा पाहता येणार आहे. त्यामुळे सदर रस्ता व पूल हे केवळ दळणवळण मार्ग ठरणार नसून एकूण आराखड्याच्या सांस्कृतिक व भावनिक मांडणीला साजेसे असेल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.





