Top 10 News : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी ते २ माजी आमदारांसह ४० जणांवर गुन्हा दाखल; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी ते २ माजी आमदारांसह ४० जणांवर गुन्हा दाखल; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) तुकाराम मुंढेंच्या FDAला कोर्टाचा दुसऱ्यांदा झटका; MCA क्लबच्या किचनवरील बंदी उठवण्याचे आदेश
मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA यांच्यातील वादात MCAला मोठा दिलासा मिळालाय. बीकेसी येथील MCA क्लबच्या किचनवर FDAने घातलेली बंदी न्यायालयाने उठवण्याचे आदेश दिलेत. २० ऑगस्टला झालेल्या पहिल्या तपासणीत किचनला ११० पैकी ८७ गुण मिळाले होते. त्यानंतर २५ ऑगस्टला पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आले. २७ ऑगस्टला झालेल्या दुसऱ्या तपासणीत किचनचे गुणांकन वाढून ९५ झाले. तरीही कारवाई सुरू राहिल्याने MCAने न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान समाधानकारक गुणांकन असताना बंदी कायम ठेवण्याच्या FDAच्या निर्णयावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. अखेर २९ ऑगस्टला किचनवरील बंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, BMC शाळांमधील मध्यान्ह भोजनाच्या दर्जाबाबतही FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आलीय. (Top 10 News)
२) आंदोलन करणाऱ्या २ माजी आमदारांसह ४० जणांवर गुन्हा दाखल
सांगलीच्या जत तालुक्यात आंदोलन करणाऱ्या दोन माजी आमदारांसह ४० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. जत शहरातील महाराणा प्रताप चौकात जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी रास्ता रोको करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि मन्सूर खतीब यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार कारवाई करण्यात आलीय. या कारवाईमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. (Top 10 News)
३) पुणे शिक्षक मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफने आपला उमेदवार जाहीर केलाय. २३ ऑगस्ट रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. संघटनेशी बांधिलकी, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण या निकषांवर गावडे यांची निवड झाल्याचे टीडीएफने सांगितले. मात्र, शिक्षक संघटनेने शिक्षक उमेदवाराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी असताना संस्थाचालकाला उमेदवारी दिल्याने संघटनेत नाराजी निर्माण झाल्याचा दावा केला जातोय. (Top 10 News)
४) ममता बॅनर्जींना मोठा झटका; हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोलकात्यातील हेस्टिंग्स पोलीस ठाण्यात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. २८ ऑगस्ट रोजी कॅथेड्रल रोडवर तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषद स्थापना दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीसाठी कोलकाता हायकोर्टाने रस्त्याचा केवळ एक भाग वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजू व्यापल्याचा आरोप आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. कार्यकर्त्यांनी बॅरिकेड हटवल्याचा आणि पोलिसांशी धक्काबुक्की केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय. दुपारी १२ ते ३ या वेळेत रॅली सुरू होती. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरूय. (Top 10 News)
५) अमेरिकेचं काश्मीरवर मोठं विधान; पाकिस्तानची तळपायाची आग मस्तकात
काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या एका विधानामुळे भारत-पाकिस्तानच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झालीय. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी श्रीनगर दौऱ्यात काश्मीर हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचा दावा केलाय. या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही तासांतच तीव्र प्रतिक्रिया देत हे भाष्य चुकीचे असल्याचे म्हटलेय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानची प्रतिक्रिया ही त्याच्या हताशेचे लक्षण असल्याचे म्हटलेय. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील संवेदनशील मुद्दा असून, यापूर्वी अमेरिकेने दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अमेरिकेच्या राजदूतांच्या ताज्या वक्तव्याची राजनैतिक वर्तुळात चर्चा सुरू झालीय. मात्र, या विधानामुळे अमेरिकेच्या काश्मीर धोरणात अधिकृत बदल झाला आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी अमेरिकन सरकारची औपचारिक भूमिका पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Top 10 News)
६) रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; e-KYC ची मुदत वाढली
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त दरात धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना e-KYC पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मिळालेल्या माहितीनुसार, e-KYC साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रेशन कार्ड ज्या राज्यात किंवा जिल्ह्यात बनले आहे, त्याच ठिकाणी e-KYC करणे बंधनकारक नाही. उदाहरणार्थ, रेशन कार्ड कानपूरचे असले आणि लाभार्थी सध्या दिल्लीत राहत असेल, तरी दिल्लीतील जवळच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातून e-KYC करता येऊ शकते. यासाठी आधार कार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. POS मशीनद्वारे e-KYC पूर्ण केली जाते. तसेच CSC केंद्र किंवा संबंधित खाद्य व पुरवठा कार्यालयातूनही प्रक्रिया करता येते. e-KYC न केल्यास रेशन कार्डवरील नावावर परिणाम होऊ शकतो, अशी सूचना देण्यात आलीय. (Top 10 News)
७) पहिल्या फोल्डेबल आयफोनसह Appleचा मोठा धमाका; iPhone 18 Pro सीरीजही होणार लॉन्च!
Apple सप्टेंबरमध्ये आपल्या ग्राहकांना मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचा लाँच इव्हेंट ९ सप्टेंबर २०२६ रोजी होऊ शकतो. यामध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सोबत पहिला फोल्डेबल iPhone Ultra सादर होण्याची शक्यता आहे. iPhone 18 Pro सीरीजमध्ये नवीन A20 Pro चिप, छोटा Dynamic Island आणि सुधारित कॅमेरा फीचर्स मिळू शकतात. Pro Max मॉडेलमध्ये मोठी बॅटरी आणि अधिक प्रगत कॅमेरा सिस्टम असण्याची चर्चा आहे. दरम्यान, फोल्डेबल iPhone Ultra मध्ये ५.३ इंचाचा बाह्य आणि ७.७ इंचाचा अंतर्गत डिस्प्ले मिळू शकतो. यासोबत Apple Watch Series 12, Watch Ultra 4 आणि AirPods 5 चे नवीन मॉडेल्सही सादर होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
८) मेटल बॉडीसह Atherची नवी ई-स्कूटर लॉन्च; २०० किमी रेंज, किंमत फक्त ९९,९९९ रुपयांपासून!
Ather Energyने बहुचर्चित Ather KONARC इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केलीय. मेटल बॉडी, स्मार्ट की आणि अनेक अत्याधुनिक फीचर्स हे या स्कूटरचे प्रमुख आकर्षण आहे. कोणार्कच्या S-Line सीरिजची सुरुवातीची किंमत ९९,९९९ रुपये एक्स-शोरूम असून, यात १०० किमी रेंज मिळते. १२५ किमी रेंजच्या व्हेरिएंटची किंमत १ लाख २१ हजार, तर १६१ किमी रेंजच्या मॉडेलची किंमत १ लाख ४४ हजार ९९९ रुपये आहे. कंपनी २०० किमी रेंजचे मॉडेलही आणणार आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ७० किमी प्रतितास असून, Z-Lineमध्ये तो ८० किमी प्रतितास असणार आहे. कोणार्कमध्ये ३१ लिटर अंडरसीट स्टोरेज, TFT कन्सोल, नेव्हिगेशन, व्हॉइस कंट्रोल, ब्लूटूथ, OTA अपडेट्स, क्रॅश अलर्ट आणि हिल-होल्ड असिस्टसारखे फीचर्स मिळतात. (Top 10 News)
९) रक्षाबंधनाला ‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; ३ दिवसांत १६५ कोटींचा टप्पा पार!
साऊथ सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केलीय. २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत भारतात १६५.३५ कोटी रुपयांची नेट कमाई केलीय. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने अंदाजे २६.६० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी १०१.१० कोटी, तर दुसऱ्या दिवशी ३७.६५ कोटी रुपयांची कमाई झाली. भारतातील ग्रॉस कलेक्शन १९७.७० कोटी रुपयांवर पोहोचले असून, परदेशातील कमाईसह चित्रपटाने २२१.४५ कोटी रुपयांचा जागतिक टप्पा गाठल्याची माहिती आहे. तिसऱ्या दिवशी हिंदी आवृत्तीने सर्वाधिक १९.१५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटात यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Top 10 News)
१ ०) ‘संघ जाहीर होण्याआधी आगरकरांचा आला कॉल अन्…’, सूर्याचा पहिल्यांदाच खुलासा
भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवून थेट संघातून वगळण्यात आलेय. यावर मौन सोडत सूर्याने सांगितले की, संघ जाहीर होण्याच्या २-३ दिवस आधी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा फोन आला आणि त्यांनी ‘पुढे जाण्याची वेळ आली आहे’ असे स्पष्ट केले. आपल्या नेतृत्वात एकही मालिका न गमावल्यामुळे सर्व सुरळीत सुरू असताना हा बदल का झाला, या विचारात तो दीड महिना घरी बसून होता. मात्र, भविष्यात संधी मिळाल्यास आपण खेळण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचे त्याने नमूद केले.





