इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी! निवडणूक आयोग आज सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने सुद्धा आज (रविवारी, दि. १६) स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन पद्धतीने सुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे.
त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. १६) देखील सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दि. १७ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.





