Shweta Mahale : मोठी बातमी! भाजप महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्रातील मजकूर खळबळजनक

चिखलीः नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. या प्रकरणी महाले यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार देणार असल्याचे माहिती मिळत आहे.
या पत्रामध्ये ‘तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती,’ असा उल्लेख नमूद असल्याचे खुद्द श्वेता महालेंनी सांगितले आहे. या प्रकरणी आमदार श्वेता महाले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे गाठत तक्रार देणार आहे. एका महिला आमदाराला जीवे मारण्याच्या धमकीमुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आमदार श्वेता महाले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले?
मी या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी अशा लोकांसमोर आणून त्यांचा बुरखा फाडावा. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा या पत्रातील मजकूर आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकांचा बुरखा फाटला पाहिजे. त्यांच्यां विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. धमकी देणाऱ्या लोकांविरोधात सरकारने पाऊल उचललं पाहिजे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे.
…त्याचा राग ठेवून हे धमकीचे पत्र
मागच्या काळात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे झाली. काँग्रेसच्या काळात एवढी विकास कामे कधी झालीच नाहीत. आम्ही कधी जाती भेद केला नाही, निवडणुकीत काँग्रेसने धर्माचे राजकारण केले. त्याचा राग ठेऊन हे धमकीचे पत्र मला आलं असल्याचे महाले म्हणाल्या आहेत. मला माझ्या मतदारसंघात सुरक्षेची काही गरज नसल्याची प्रतिक्रिया देखील महाले यांनी यावेळी बोलताना दिली आहे.





