SSC HSC Exam Dates: 10वी-12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सर्व माहिती…

SSC – HSC Exam Dates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा परीक्षा नेहमीपेक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत, तर दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे.
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर –
शासनाच्या परिपत्रकानुसार, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडतील. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन आणि NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.
नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांद्वारे या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीच्या लेखी परीक्षांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याचा उद्देश –
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे व्हावे आणि त्यांच्यावरील मानसिक ताण कमी व्हावा, या उद्देशाने मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर केले आहे. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे –
यंदाच्या वर्षी परीक्षा लवकर होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी तातडीने सुरू करण्याची गरज आहे. शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.





