Big News: धरणात पर्यटकांची बोट बुडाली; 4 जणांचा मृत्यू, 12 जण अद्याप बेपत्ता
Big News: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोटीवर एकूण ३० पेक्षा जास्त पर्यटक सवार होते, त्यापैकी १५ जणांनी पोहत काठ गाठल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

Big News: मध्य प्रदेशातील जबलपूर येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नर्मदा नदीवर असलेल्या प्रसिद्ध बरगी धरणात पर्यटकांनी भरलेली एक बोट बुडाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत चार जणांचे मृतदेह हाती लागले असून, १२ प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोटीवर एकूण ३० पेक्षा जास्त पर्यटक सवार होते, त्यापैकी १५ जणांनी पोहत काठ गाठल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
गुरुवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वेगवान वादळामुळे आणि पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. याच दरम्यान खमरिया टापूजवळ पर्यटकांची ही क्रूझ बोट पाण्याचा अंदाज न आल्याने आणि निसरड्या लाटांमुळे आपले संतुलन गमावून बसली आणि क्षणात पाण्यात उलटली.
Madhya Pradesh | Four dead, 15 rescued and search operation underway for 12 others after a cruise capsized in Bargi Dam, Jabalpur. Search and rescue operation is underway: Jabalpur Collector Raghvendra Singh
— ANI (@ANI) April 30, 2026
बेपत्ता लोकांचा शोध सुरू –
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह आणि पोलीस प्रशासनासह एसडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले असून मोटर बोटी आणि स्पीड बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली जात आहे.
जबलपूरचे पालकमंत्री राकेश सिंह यांनी देखील या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, ते ड्युमना विमानतळावरून थेट घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जबलपूर शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या बरगी धरणाची निर्मिती ५१ वर्षांपूर्वी झाली असून, ते नर्मदा नदीवरील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे.
मध्य प्रदेश पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स केंद्र असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या अंधार आणि खराब हवामानाचे आव्हान पेलत बचाव पथक बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे.




