Uday Samant : दोन दिवसात पुण्यातील बडे नेते शिवसेनेत येणार: मंत्री उदय सांमतांचा मोठा दावा, म्हणाले त्यांची नावही जाहीर करणार…

पुणेः राज्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या अॅापरेशन टायगरची मोठी चर्चा आहे. नुकताच शिवसेना उबाठाचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळातही अनेक नेते अॅापरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या हाती टायगर अॅापरेशनची मदार दिली असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांत पुण्यातील काही बडे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आम्ही काही ऑपरेशन टायगर हे नाव ठेवलं नाही. तुम्ही (मीडियाने) हे बारसं केलं असल्याची प्रतिक्रिया सामतांनी माध्यमांना बोलताना दिली.
काय म्हणाले उदय सामंत ?
ऑपरेशन टायगर हे पत्रकारांनी नाव दिले आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यावरच विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ते देखील कोणत्याही ऑपरेशनशिवाय, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली.
राहुल गांधींवर साधला निशाणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वत्र त्यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही, ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, महाराष्ट्रातील महापुरुषांचे कार्य त्यांना माहीत नाही, अशांना आम्ही इतिहास शिकवावा ही दुर्देवाची गोष्ट आहे, असा निशाणा उदय सामतांनी राहुल गांधी यांच्यावर साधला.





