वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर; पोस्टमार्टेम अहवाल धक्कादायक, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

Vaishnavi Hagavane death case : पुण्यातील मुळशीत तालुक्यातील भूकूम गावात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपी या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे देखील निर्देश आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, नुकताच वैष्णवी हिचा श्ववविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट) समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या पोस्टमार्टेम अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुना आढळून आले असून विषबाधा झाली आहे का याची तपासणी सुरू आहे. बावधन पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहे, कारण राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटातील नेते आहेत. तिच्या मृत्यूमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा १६ मे २०२५ रोजी भुकूम येथील राहत्या घरात मृतदेह आढळून आला. यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. मयत वैष्णवी हिच्या वडिलांनी बावधन पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सासरच्यांनी तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अपमानास्पद वागणूक, चारित्र्यावर संशय अन्..
२०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला. मोठ्या थाटामाटत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची सर्वत्र मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. तब्बल ५१ तोळे सोने, चारचाकी वाहन देण्यात आले होते. मात्र, विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी चांदीच्या भांड्याबाबत अपमानस्पद बोलणे, तिच्या चारित्र्यवार संशय घेणे आणि शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच वैष्णवी गरोदर असताना तिला घराबाहेर काढण्यात आले होते. तिने विष घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. परंतु ती वाचली.
वडिलांचा गंभीर आरोप
मार्च 2025 मध्ये, सासू लता आणि नणंद करिश्मा यांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या चेहऱ्यावर थुंकण्यात आले. तसेच वाकड येथे गाडीतून तिला सोडण्यात आले. त्यानंतर तिला मारहणा करण्यात आली. गाडीतून उडी मारण्याची धमकी दिल्यानंतरच मारहाण थांबली, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. यामुळे आता वैष्णवी हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आणखी कोणती माहिती येणार हे पाहावे लागेल.





