Pune District : बोरी-खोडद गटात मोठी चुरस

बेल्हे : जुन्नर तालुक्यात नव्याने तयार झालेल्या बोरी-खोडद जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला) आरक्षण निश्चित झाल्याने स्थानिक राजकारणात चुरस वाढली आहे. या गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक महिला उमेदवारांची संख्या मोठी असून, पंचायत समितीसाठी बोरी बुद्रुक गण सर्वसाधारण तर खोडद गण ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे.
या गटात जिल्हा परिषदेसाठी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष कविता संदीपान पवार, विशाल जुन्नर पतसंस्थेच्या माजी संचालिका संगीता भास्कर गाडगे, बोरी खुर्दच्या सरपंच कल्पना वैभव काळे, जयश्री खंडागळे, पुष्पा अमोल कोरडे, कोमल युवराज कोरडे आणि वडगाव कांदळीच्या माजी सरपंच माधुरी सचिन निलख या प्रमुख महिला इच्छुक आहेत.
तर पंचायत समितीसाठी पारगावचे संभाजी चव्हाण, माजी सरपंच रामदास पवार यांच्या पत्नी मनीषा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित राजेंद्र नरवडे, प्रगती सुदर्शन बडे हे इच्छुक आहेत. एका-एका पक्षाचे दोन ते तीन इच्छुक उमेदवार असल्याने तिकीट कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐनवेळी कोण पक्ष प्रवेश करणार आणि कोणाला तिकीट मिळणार, यावर या गटातील निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल.
गटातील समस्या
या गटात बिबट्यांची मोठी समस्या आहे. तसेच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळणे, वाड्या-वस्त्यांचे रस्ते तयार करणे आणि आरोग्याच्या सुविधा पुरवणे अशा गंभीर समस्या या गटात आहेत.
गटात समाविष्ट गावे
या गटामध्ये बोरी बुद्रुक, जाधववाडी, निमगाव सावा, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, पिंपरी कावळ, खोडद, कांदळी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, येडगाव या गावांचा समावेश आहे.
फोटो – जिल्हा परिषद





