Chandrakant Patil : पुण्यातील १७ टेकड्यांबाबत मोठा निर्णय; अशा प्रकारची उपाययोजना राबविणारः मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वनविभागाला आदेश

पुणेः येथे वन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील यांनी पुणे शहरात येणाऱ्या टेकड्यांबाबत वनविभागाला काही आदेश दिले आहेत. पुणे शहरात एकूण 17 टेकड्या आहेत. या सर्व टेकड्या वन विभागाच्या अंतर्गत येतात. त्या टेकड्यांचे क्षेत्रफळ किती? टेकड्यांवर झाडे किती? या सर्वांची माहिती घेण्याचे आदेश चंद्रकांत पाटील वनविभागाला दिले आहेत. येथील म्हातोबा टेकडीवर आगीच्या तीन घटना घडल्या होत्या. या आगीच्या घटनेत तब्बल अडीच हजार झाडांचे नुकसान झाले. यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, सुरक्षा गार्ड नेमणे, वॅाच टॅावर उभे करणे, गवत साचू न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच त्यानुसार उपाययोजना करण्याच ठरले.
पुण्यातील एका टेकडीमुळे सर्व टेकड्यांचा प्रश्न समोर आला आहे. टेकड्यांवरील वणवे, सायंकाळनंतर फिरणारी जोडपी, अतिक्रमण आदी गोष्टींवर कडक लक्ष ठेवण्यात येईल. तसेच सायंकाळनंतर टेकडीवर गस्त घालण्यासाठी मनुष्यबळाची सोय केली जाईल, अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पाटील यांना यावेळी बोलताना दिला. तसेच म्हातोबा टेकडीवर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साडेसहा हजार झाडे लावली होती. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये तिथे आग लागली आणि लावण्यात आलेली अडीच हजार झाडे आगीत जळाली. आता या पुढे वनविभागाला यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
…..अन्यथा शिक्षणाचे माहेरघर
काही महिन्यांपूर्वी अभिनेते रमेश परदेशी यांनी वेताळ टेकडीवरील अल्पवयीन मुलीने केलेल्या एक प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता. अल्पवयीन मुलीने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. यामुळे प्रत्येक पुणेकरांनी विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर उडता पंजाब होईल, अशा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.





