IRCTC Website : रेल्वे प्रवाशांना मोठा फटका ! आयआरसीटीसीची वेबसाईट तासभर झाली ठप्प

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सेवेवर परिणाम झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना बुकिंग करता आले नाही, तर अनेकांचे बुकिंग रद्द आपोआप रद्द झाले. बराच वेळ डाऊनटाईम मेसेज वेबसाईटवर झळकत होता. आयआरसीटीसी सेवा सोमवारी सकाळी जवळपास तासभर ठप्प झाली होती. परिणामी आयआरसीटीसीवर पुढील 24 तास कोणतेही नवीन अकाऊंट उघडता येणार नाही.
जवळपास तासभर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर एकच मेसेज दाखवला जात होता. मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीमुळे ई-टिकिटिंग सेवा उपलब्ध नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असा मेसेज संकेतस्थळावर दाखवला जात होता. तिकीट कॅन्सलेशन किंवा फाइल टीडीआरसाठी कृपया कस्टमर केअर नंबरवर फोन करण्यास सांगितले जात होते. तसेच 14646, 0755-6610661 आणि 0755-4090600 येथे फोन किंवा [email protected] येथे मेल करण्यास सांगितले जात होते.
दरम्यान, तासाभराच्या गोंधळानंतर आता आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ऍप व्यवस्थित काम करत आहे.आयआरसीटीसीच्या सेवा पुन्हा पूर्ववत झाल्या असल्या तरी प्रवाशांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून पुढील 24 तास म्हणजेच 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रवासी नवीन अकाऊंट सुरू करू शकणार नाहीत. यासोबतच तुमचे अकाऊंट असल्यास त्याचा पासवर्ड देखील पुढील 24 तास बदलू शकणार नाही.





